पारनेर : प्रतिनिधी
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान सहा वर्षीय प्रियांशी बागडे या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी केली आहे.
सुपा, ता. पारनेर येथील रहिवासी असलेल्या प्रियांशी बागडे हिला डोळ्यात तिरळेपणाचा त्रास असल्याने शस्त्रक्रियेसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालय प्रशासनाने सर्व वैद्यकीय तपासण्या आणि अहवाल सामान्य असल्याचे सांगितल्यानंतर पालकांनी डॉक्टरांवर विश्वास ठेवून उपचारास संमती दिली होती.
मात्र शस्त्रक्रियेपूर्वी ऑपरेशन थिएटरमध्ये डोळ्यांत औषधी ड्रॉप टाकल्यानंतर प्रियांशीची प्रकृती अचानक गंभीररीत्या बिघडली. तिला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्यानंतर तातडीने आयसीयूमध्ये हलवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पालकांना योग्य माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
खासदार नीलेश लंके यांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सर्व अहवाल सामान्य असताना अशी गंभीर प्रतिक्रिया कशी झाली, ऑपरेशनपूर्वी आवश्यक वैद्यकीय प्रोटोकॉलचे पालन झाले होते का, प्रकृती बिघडत असताना पालकांना वेळेवर माहिती का देण्यात आली नाही, तसेच उपचार प्रक्रियेत निष्काळजीपणा झाला का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
एका निष्पाप चिमुरडीचा जीव गेला आहे. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेऊन सरकार आणि आरोग्य विभागाने तातडीने उच्चस्तरीय चौकशी करावी. दोषी आढळणाऱ्या डॉक्टर, कर्मचारी किंवा रुग्णालय प्रशासनावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे लंके यांनी म्हटले आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रियांशी बागडे हिला न्याय मिळावा, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.
