साकोरेमळा शाळेची शैक्षणिक क्षेत्रात भरारी;शिष्यवृत्तीत २२ सैनिक स्कूलसाठी १४, नवोदयसाठी ३ ज्ञानप्रबोधिनीसाठी २ विद्यार्थ्यांची निवड

Share

मंचर : साकोरेमळा (शिंगवे, ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती, केंद्रीय सैनिक स्कूल, नवोदय विद्यालय तसेच ज्ञानप्रबोधिनी प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विविध परीक्षांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते सत्कार करून गुणगौरव करण्यात आला.

इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचे तब्बल २२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. केंद्रीय सैनिक स्कूल निवड परीक्षेत १४ विद्यार्थ्यांनी यश मिळविले, तर तीन विद्यार्थी नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरले. ज्ञानप्रबोधिनी प्रवेश परीक्षेतूनही शाळेच्या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वर्गीय अजित पवार मॉडेल स्कूल, जिल्हा पुणेचे समन्वयक सिद्धार्थ चव्हाण होते. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षकाच्या कार्याचा अनोखा गौरव; पालकांकडून ‘बुलेट’ भेट

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते इयत्ता पाचवीचे वर्गशिक्षक नितीन भास्कर शेजवळ यांच्या शैक्षणिक कार्याचा पालकांनी केलेला अनोखा गौरव. विद्यार्थ्यांच्या यशामागील त्यांच्या मेहनतीची दखल घेत इयत्ता पाचवीच्या पालकांनी शेजवळ यांना रॉयल एनफिल्ड क्लासिक बुलेट भेट दिली. विवेक वळसे पाटील, ग्रामस्थ आणि पालकांच्या उपस्थितीत ही भेट प्रदान करण्यात आली.

इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनीही शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली. या परीक्षेत १७ विद्यार्थी चांगल्या गुणांनी पात्र ठरले. यामध्ये श्रीजा रवींद्र विधाते हिने तालुक्यात प्रथम, तर शिवम हनुमंत बोराडे याने तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविला. दोन्ही विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांचे मार्गदर्शक शिक्षक अभिजीत नाटे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

दीडशे विद्यार्थ्यांवर बक्षिसांचा वर्षाव

इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्येही यशाची परंपरा कायम राखली. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या सुमारे दीडशे विद्यार्थ्यांना भरघोस बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. छत्री, एज्युकेशनल किट, स्मार्ट वॉच, टिफिन, पाण्याची बॉटल, अनब्रेकबल पॅड, स्किपिंग रोप, स्टडी टेबल, कंपास, पेन आदी बक्षिसांचा त्यामध्ये समावेश होता.
तसेच इयत्ता पहिली ते तिसरीमधील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवंत ठरलेल्या शंभर विद्यार्थ्यांचाही बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आला.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या इयत्ता पहिलीच्या शिक्षिका आरती डोंगरे, शिक्षक मच्छिंद्र चासकर, इयत्ता दुसरीचे वर्गशिक्षक बाबाजी गाढवे तसेच इयत्ता तिसरीच्या वर्गशिक्षिका वंदना चासकर यांच्या शैक्षणिक कार्याचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, साकोरेमळ्यातील ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन बाबाजी गाढवे यांनी केले, तर नितीन शेजवळ यांनी आभार मानले.
शिष्यवृत्तीपासून सैनिक स्कूल, नवोदय आणि ज्ञानप्रबोधिनीपर्यंत विविध परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या घवघवीत यशामुळे साकोरेमळा शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची सर्वत्र चर्चा होत असून विद्यार्थी आणि शिक्षकांचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

we

Related Articles

ताज्या बातम्या