मंचर-निलीमा खळे
आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचा निकाल घोषित झाला आणि अवघ्या १५६६ मतांनी देवदत्त निकम हे पराभूत झाले. सात टर्म चढत्या मताधिक्याने विजयी होणारे महायुतीचे उमेदवार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा निसटता विजय झाला. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विजयापेक्षा देवदत्त शिवाजीराव निकम यांच्या ट्रंपेट ने घेतलेल्या मतांमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त जयवंतराव निकम यांचा१५६६ मतांनी पराभव झाला या पराभवाची खंत व्यक्त करत संपूर्ण मतदारसंघील महीला, शेतकरी,मतदार हळहळले..
गेली सात टर्म आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे त्यांनी आपल्या कारकिर्दीत 1990 साली पहिली विधानसभा निवडणूक लढवली आणि तेव्हापासून त्यांनी आपल्या मताधिक्यामध्ये भर टाकत विजय संपन्न केला आहे. राजकारणात दिग्गज नेते माजी खासदार किसनराव बाणखेले, अविनाश रहाणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पत्नी कल्पना आढळराव पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, राजाराम बाणखेले यांचा पराभव केला आहे.
दिलीप वळसे पाटील नेहमी विकास कामांच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे गेले. त्यांनी आपल्या विरोधकांना नेहमीच धोबीपछाड देत आंबेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये निर्विवाद वर्चस्व असल्याचे सिद्ध केले. त्यांचे एकेकाळाचे सहकारी असणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांच्या विरोधात जाऊन शिवसेना पक्षाकडून खासदार म्हणून आपला नावलौकिक केला होता. शिवाजी आढळराव पाटील यांनी अनेक राजकीय डाव टाकले तरीही त्यांना दिलीप वळसे पाटील यांना आव्हान देणे शक्य झाले नव्हते.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कडून देवदत्त निकम यांनी महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांना कडवे आव्हान दिले. थोडक्या मतांनी देवदत्त निकम यांचा पराभव झाला.
हा पराभव होण्यास मुख्य कारण ठरले ते वळसे पाटील यांनी देवदत्त निकम यांच्या विरोधात टाकलेला राजकीय डाव ..? या निवडणुकीत देवदत्त जयवंतराव निकम हे महाविकास आघाडीचे उमेदवार तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर उमेदवार होते तर त्यांच्याच नावात साधर्म्य असणारे दुसरे उमेदवार होते. देवदत्त शिवाजीराव निकम आणि त्यांचे चिन्ह होते ट्रंपेट.. या दोन नावांमध्ये आणि चिन्हांमध्ये काही अंशी साधर्म्य असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांना पडणारी मते देवदत्त शिवाजीराव निकम यांच्या ट्रंपेट चिन्हाला पडली. ट्रंपेट चिन्हाला २९६५ मते मिळाली आणि देवदत्त जयवंतराव निकम यांचा १५६६ मतांनी पराभव झाला.
हा पराभव ट्रंपेटला पडलेल्या मतांमुळे झाल्याची चर्चा आंबेगाव तालुक्यात आहे. देवदत्त निकम यांनी महायुतीचे बलाढ्य नेते दिलीपराव वळसे पाटील यांचा पराभव केलाच होता.. मात्र ट्रंपेट यांनी मते घेतल्याने तो शक्य झाला नाही. हे शल्य आंबेगाव तालुक्यातील अनेक मतदारांमध्ये असल्याचे दिसून आले. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर देवदत्त निकम यांच्या नागापुर येथील निवासस्थानी लोकांनी भेटी देऊन अक्षरशा डोळ्यांमध्ये पाणी आणून हळहळ व्यक्त केली. गावागावातील चौकांमध्ये शेतामध्ये देवदत्त निकम यांचा पराभव ट्रंपेट मुळेच झाला. अशी खंत व्यक्त करून लोक हळहळ व्यक्त करत आहेत .खरंच देवदत्त निकम यांना आपण थोडी साथ दिली असती किंवा त्यांच्यासाठी थोडे काम केले असते तर सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आंबेगाव विधानसभेचा आमदार झाला असता अशी सर्वत्र चर्चा असल्याची दिसून आली.
देवदत्त निकम खंबीर
संपुर्ण तालुका हळहळ करत असताना महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम हे खंबीर असल्याचे दिसले. या निवडणुकीत आंबेगाव विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मलाच निवडुण दिले आहे. विरोधकांनी माझा हा विजय कटकारस्थान करुन हिरावुन घेतला आहे. त्याचा वचपा आगामी काळात मतदार घेतील.
मी सर्वसामान्य जनतेच्या सुख दुःखात सहभागी होण्यास सुरुवात केली आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सरकार विरोधात ठाम भूमिका घेणार असल्याचे वास्तव मराठीशी बोलताना त्यांनी व्यक्त केली आहे.
