मंचर (प्रतिनिधी)
आंबेगाव विधानसभा मतदारसंघातुन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवदत्त निकम यांचा पराभव केला.थोड्या मंतांनी देवदत्त निकम यांचा झालेला पराभव आणि ट्रम्पेट चिन्हावर लढलेल्या देवदत्त निकम यांना पडलेल्या मतांमुळे सोशल मिडियामध्ये चांगलीच चर्चा रंगली असताना
आता विजयी उमेदवार आ.दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पुर्वा वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांच्या कन्या निलीमा निकम यांच्या पोस्ट ही सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत.
महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या नागापूर गावामध्ये त्यांनी आभार मेळावा घेतला. या मेळाव्यात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केल्याची चर्चा झाली. त्याला उत्तर म्हणून सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी भावनिक पोस्ट लिहीत देवदत्त निकम यांच्या कार्यकर्त्यांना उत्तर दिले. त्यानंतर देवदत्त निकम यांच्या कन्या नीलिमा देवदत्त निकम यांनी पूर्वा वळसे पाटील यांच्या पोस्टला उत्तर दिले असून या दोन्ही पोस्ट सोशल मीडियामध्ये कार्यकर्ते शेअर करत आहेत.

पुर्वा दिलीपराव वळसे पाटील यांची पोस्ट
राज्यातील ज्येष्ठ नेते आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या प्रदीर्घ राजकीय जीवनात त्यांनी आजवर विरोधकांबद्दल कधीही वाईट शब्द काढला नाही, राज्याच्या राजकारणातील अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली परंतु त्यांच्याबद्दल देखील कोणीही कधी वाईट बोलले नाही.
आपल्या सर्वांना माहीतच आहे की, काही महिन्यांपूर्वी त्यांचा एक दुर्दैवी अपघात झाला. एका मोठ्या शस्त्रक्रियेनंतर ते या दुखापतीतून जिद्दीने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही संपूर्ण कुटुंब या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांच्यावर झालेल्या मोठ्या शस्त्रक्रियेमुळे त्यांची प्रकृती थोडीशी खालावलेली असते. थोड्याच दिवसात ते या संकटावर सुद्धा मात करून नक्कीच पूर्वीसारखे व्हावेत अशी आम्ही रोज परमेश्वराकडे प्रार्थना करतो.
परंतु काही दिवसांपूर्वी विरोधकांच्या आभार मेळाव्यात त्यांच्या प्रकृती बद्दल बोलताना “लवकरच विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांना आपल्याला सामोरे जावे लागेल” असे अभद्र वक्तव्य केले गेले..
हे ऐकल्यानंतर काय बोलावे मला सुचत नाही. काही दिवसांपूर्वी वळसे पाटील साहेबांचा फोटो ज्यांनी आपल्या घरातील देव्हाऱ्यात लावला होता तेच आज साहेबांच्या अंताची प्रार्थना करीत आहेत? तुम्ही नक्की निवडणुका लढा, जिंका, त्यात हरकत असण्याचे काही कारण नाही परंतु या सर्व गोष्टी करत असताना उन्माद किती असावा? सत्ता मिळवण्याच्या नादात आपण किती खालच्या पातळीला जात आहोत?
शत्रुत्व करण्याच्या नादात आपण कोणतीच मर्यादा ठेवली नाही का? सुसंस्कृतपणाचा वारसा सांगणाऱ्या आपल्या तालुक्यातील राजकारणाचा स्तर इतका खाली गेलाय का ? तालुक्यात पस्तीस वर्षे जनतेची अविरत सेवा केलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीच्या प्रकृतीबद्दल असे बोलताना आपली जीभ जराही कचरली नाही का? ज्या आदरणीय साहेबांनी आम्हाला कुटुंब म्हणून नेहमी कमी वेळ दिला परंतु या तालुक्यातील जनतेसाठी ते अहोरात्र उपलब्ध राहिले त्यांच्या मरणाची वाट पाहेपर्यंत काही लोकांची या तालुक्यात मजल गेली आहे का? आणि त्याच जोरावर काही लोक आमदारकीची स्वप्ने पाहत आहेत का ? भविष्यात यांच्यासारख्याच लोकांना आपला सुसंस्कृत तालुका आपले प्रतिनिधी म्हणून स्वीकारणार आहे का? ज्यांनी तुम्हाला मोठे केले घडवले त्यांच्याबद्दल तुमच्या मनात असे विचार आहेत का?
कृतघ्नपनाचा कळस गाठलेल्या या लोकांसाठी राजकारण आणि निवडणुका हेच सर्वस्व आहे का? एखाद्या आजारी व्यक्तीची तुम्ही मरणाची कामना करणार का? माणूस आणि माणुसकीला काहीच किंमत उरली नाही का? अशा असंख्य प्रश्नांचे काहूर माझ्या मनात दाटून आले आहे. असे काही ऐकून त्यावर उत्तर देण्यापेक्षा मला नकोच ते राजकारण असे वाटू लागले आहे.
- पूर्वा दिलीप वळसे पाटील.
पुर्वा वळसे पाटील यांना उत्तर दिलेली निलीमा देवदत्त निकम यांची पोस्ट

देवदत्त निकम यांच्या लेकीचे प्रत्युत्तर..!👇🏻
अहो मोठ्ठ्या ताई…!
आज तुम्हाला बाप आठवलाच आहे म्हणून…
📌तुम्ही पोसलेल्या गावगुंडांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या सभेत शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या माझ्या बापाला ढकललं तेव्हा तुम्ही स्वतः कौतुकाने त्याची व्हिडिओ काढत होतात आणि DJ वर ठेका धरला होता.
तिथं नाही का हो तुम्हाला बाप आठवला ❓
📌शेतकरी संघटनेचा गावगाड्यातला एक साधा कार्यकर्ता पिंपळगावचा प्रभाकर बांगर, तुमच्याच इशाऱ्यावरून तुम्ही पोसलेल्या गावगुंडांनी प्रभाकर बांगर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रक्तबंबाळ होईपर्यंत त्यांना मारलं…
तो कार्यकर्ता प्रभाकर बांगरही कुणाचा तरी बाप होता…
तिथं नाही का हो तुम्हाला बाप आठवला ❗
📌ऑगस्ट महिन्यात आदिवासी लेकरांच्या दुधात अळ्या सापडल्या. आदिवासीं मुलांच्या जेवणात आळ्या निघाल्या त्याच्यावर कारवाई करायची सोडून तुम्ही आवाज उठवणाऱ्यांवरच गुन्हे दाखल केले. आपल्या मुलांना अळ्यांचे दूध प्यावे लागते, जेवण जेवावे लागते हे बघून त्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या बापाची काय ओ हालत झाली असेल.
तिथं नाही का तुम्हाला बाप आठवला… ❗
📌५ मे २०२४ रोजी तुम्ही देवदत्त निकम यांना (माझ्या वडिलांना) एका खोट्या आरोपात अडकवण्यासाठी तुमचे वडील प्रयत्नांची पराकाष्टा करत होते, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणत होते. मंचर पोलीस स्टेशन येथे मोर्चा काढून माझ्या वडिलांच्या नावाने नको नको ते फ्लेक्स फडकावले. तिथं माझा बाप एकटा तुमच्या कटकारस्थानाविरोधात लढत होता.
तेव्हा नाही का हो तुम्हाला बाप आठवला… ❗
📌घरातील देव्हाऱ्यात जो फोटो माझ्या वडिलांनी वळसे पाटील साहेब यांचा 25 वर्ष लावला होता तो फोटो ज्या दिवशी तूम्ही सर्वांनी माझ्या वडिलांना जेल मध्ये घालण्यासाठी जे प्रयत्न केले ते पाहून आमच्या घरच्या सगळ्या लोकांच्या विचाराने तो फोटो आम्ही उतरवला
माझ्या वडिलांना जेल मध्ये घालण्याचे जे प्रयत्न तूम्ही सगळे करत होतात ते पाहून मला काय वाटल असेल याचा विचार तूम्ही कधी केलाय का? आणि चुकून त्या दिवशी तूम्ही त्या डावात यशस्वी झाल्या असत्या तर, आमच्या कुटुंबाचं काय झाल असत, एक मुलगी म्हणून मला जे दुःख झालं असत त्याचा विचार केलाय का तूम्ही कधी?
तिथं नाही का हो तुम्हाला बाप आठवला.❗*
📌उगाच राईचा पर्वत करू नका, आज पर्यंत माझ्या वडिलांनी एकदाही श्री.वळसे पाटील साहेब, स्वतः तुमच्यावर आणि सौ.किरणताईंवर कोणतीच व्यक्तिगत टीका केली नाही हे सारा आंबेगाव शिरूर जाणतो.तुम्ही मात्र माझ्या बापाच्या बदनामीसाठी किती खालच्या थराला गेला होतात, आठवा !
तुमच्या वडिलांना (वळसे पाटलांना) हृदयविकाराचा धक्का आला भीमाशंकर कारखान्याच्या गेस्ट हाऊसला, तुमच्या आधी तिथं माझा बाप देवदत्त निकम हजर होता. ॲम्बुलन्सपासून हॉस्पिटलपर्यंत सगळं नियोजन एकटा करत होता. तुम्ही तिथं किती तासानंतर अवतरल्या ते आठवा..!
तुम्ही आभार सभेतील माझ्या वडिलांचं भाषण स्वतः ऐकल असत तर तुम्हाला समजल असत ते अस कधीच म्हणाले नव्हतेच.
त्याची लिंक तुम्हाला पाठवत आहे नक्की ऐका.आणि माझे वडिल अस कुठे बोलले आहेत त्याची लिंक तुमच्याकडे असेल तर नक्की पाठवा.
तुमच्या बाबांनी स्वतः कबूल केलं आहे की ते देवदत्त निकम यांच्या पिपाणीमुळे आमदार झाले आहेत. त्यामुळे तुम्ही हे सहानुभूतीच राजकारण बंद करा!
📝 निलिमा देवदत्त निकम
दोन्ही नेत्यांच्या लेकी आंबेगावच्या राजकीय मैदानात दिसणार..?
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा राजकीय वारसा चालवण्यासाठी पुर्वा वळसे पाटील यांनी जबाबदारी घेतली आहे. त्यांनी वळसे पाटील यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत केलेले भाषण चांगलेच गाजले होते. आपले वडील कसे ग्रेट आहेत ते त्यांनी लोकांना समजावून सांगितले होते.शिवाय प्रचारात जिथे कमी तिथे मी अशी जबाबदारी पुर्वा वळसे पाटील यांनी पार पाडली आहे.
तर निलीमा निकम या राजकारणात नवख्या आहेत.तरी कमी वयात त्यांनी आपल्या वडीलांची निवडणुक प्रतिनिधी म्हणून पार पाडलेली जबाबदारी उल्लेखनीय आहे.
सहकार मंत्री वळसे पाटील यांच्यासाठी प्रचार यंत्रणा राबण्यासाठी अनेक अनुभवी लोक महत्वाची जबाबदारी पार पाडत होते.मात्र देवदत्त निकम यांच्याकडे जबाबदारी पार पाडण्यासाठी राजकीय अनुभव असणारे लोकच नव्हते. त्यामुळे देवदत्त निकम यांची कन्या निलीमा निकम यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली. बाप देवदत्त निकम आणि लेक निलीमा निकम या दोघांनीच विधानसभा निवडणुकीचे अनेक डावपेच आखले आणि यशस्वी करुन दाखवले. या विधानसभा निवडणुकीतील अनेक गुपीतेही बाप लेकींमध्येच आहेत. एकंदरित बापाची राजकीय जबाबदारी निलीमा यांनीही या विधानसभा निवडणुकीत पेलवली आहे.
आगामी काळात या दोन्ही आंबेगावच्या लेकी आपल्या पित्याच्या राजकारणात सहभागी होतील. वेळेला राजकीय आखाड्यात समोरासमोर दिसतील आणि सुसंस्कृतपणा जोपासत आंबेगावच्या राजकीय वैभवात भर घालतील अशी आशा आंबेगावकर करत आहेत.
