विधानसभा निवडणुकीत गोंधळलेले रमेश येवले आता मात्र गोंधळ उडवणार ..?

Share

मंचर -विशेष प्रतिनिधी
विनोद शेटे

महाराष्ट्रात गाजलेल्या आंबेगाव विधानसभेच्या निवडणुकीत या वेळी आंबेगाव शिरुरच्या जनतेला अजून एका नव्या चेहऱ्याची ओळख झाली. ती म्हणजे या पूर्वी आंबेगावच्या राजकारणात कधीच चर्चेत नसलेले पण सामाजिक कार्यात दानशूर व्यक्ती म्हणून अग्रेसर असणारे युवा उद्योजक रमेश येवले यांच्या रूपाने…

आपल्या व्यवसायात भक्कमपणे उभे राहिल्यानंतर .. राजकारणात पाय रोवू पाहणारे रमेश येवले यांचा या निवडणुकीत मात्र पूर्णतः गोंधळ उडालेला जाणवला.

सुरुवातीला उमेदवारी मिळविण्यासाठी सुरू झालेला त्यांचा शोधाशोध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, संभाजी राजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षापासून ते मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा क्रांती मोर्चा पर्यंत चाचपणी करताना दिसले, मात्र शेवटी त्यांनी आपली धडपड फक्त एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना प्रवेशावर थांबवून आपली तलवार म्यान करत झाकली मूठ सव्वालाखाची या उक्तीप्रमाणे किंगमेकरच्या भूमिकेत राहणे पसंत केले.आणि ते किंगमेकर होण्यात यशस्वीही ठरले असल्याची चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.


मात्र या दरम्यान चालू असलेल्या बऱ्याच घडामोडी अन् राजकीय खेळी त्यांनी जवळून अनुभवल्या असल्याने तसेच विधानसभा निकालाची जिल्हापरिषद गटानुसार आकडेवारी पाहिली तर आता मात्र त्यांची भूमिका येथून पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खूप महत्वाची राहणार आहे.

विधानसभा निकालाची जिल्हापरिषद गटनिहाय आकडेवारी पाहिली तर रमेश येवलेंची सर्वात जास्त ताकद असलेल्या आमोंडी-शिनोली जिल्हा परिषद गटातून वळसे पाटील यांना १८४ मतांची आघाडी , कळंब चांडोली जिल्हा परिषद गटातून १९२५ मतांची देवदत्त निकम यांना आघाडी तर आमदार दिलीप वळसे पाटील यांचे निरगुडसर गाव ज्या मतदारसंघात येते त्या पारगाव अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटामधून २८८ मतांची निकम यांना आघाडी, केंदुर पाबळ गटातून देवदत्त निकम यांना १५१७ तर रांजणगाव कारेगाव गटातून निकम यांना १८५ मतांची आघाडी मिळाली आहे.


आठ गटांपैकी या पाच गटांमध्ये मताधिक्य खूपच काठावर असल्याने आणि याच भागामध्ये येवले आपल्या समर्थकांची फळी उभारण्यात यशस्वी झाल्याने भविष्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हे एकत्रित सामोरे जावू अगर न जावू पण रमेश येवले यांची भूमिका ही नक्कीच निर्णायक राहणार आहे.

त्यामुळे विधानसभेत गोंधळलेले रमेश येवले आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भल्याभल्यांचा गोंधळ उडवणार हे मात्र नक्की…

Related Articles

ताज्या बातम्या