बीड: प्रतिनिधी
राज्यात खळबळ उडवणाऱ्या बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता महत्त्वाचे अपडेट पुढे आले आहे या प्रकरणात हत्येचा आरोप असलेला वाल्मीक कराड पुण्यात असल्याची माहिती आहे. वाल्मीक कराडच्या शोधात सीआयडी कडे महत्त्वपूर्ण धागेदोरे लागले आहेत. तांत्रिक विश्लेषणात वाल्मीक कराडचं शेवटचं लोकेशन सीआयडी च्या हाती लागल आहे .
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फरार होण्यापूर्वी वाल्मीक कराड पुण्यात वास्तव्यास होता 17 डिसेंबरला वाल्मीक कराड याचे शेवटचे ॲक्टिव्ह मोबाईल लोकेशन पुण्यात दाखवल आहे. त्यानंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला आहे. पुण्यात मोबाईल बंद करून तो फरार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बीडच्या मस्साजोकचे (ता. केज) सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. या हत्या प्रकरणात वाल्मीक कराड मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे.
दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक न झाल्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांकडून घेरण्यात आला आहे, तसेच वाल्मीक कराडचा मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जवळचा संबंध असल्यामुळे त्यांना ही लक्ष्य करण्यात येत आहे. वाल्मीक कराड हा परळी नगर परिषदेचा माजी नगरसेवक व उपनगराध्यक्ष माजी गटनेता आहे. तो मंत्री धनंजय मुंडे यांचा कट्टर समर्थक म्हणून ओळखला जातो गेल्या दहा वर्षांपासून परळी मतदारसंघातील राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी कराड सांभाळत असल्याचं सांगितलं जात आहे .
वाल्मीक कराड याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत तसेच वाल्मीक कराडचे अनेक नेत्यांबरोबरही फोटो आहेत ज्यात सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शरदचंद्र पवार यांच्यासह अन्य प्रमुख राजकीय नेत्यांचा समावेश आहे केज पोलीस ठाण्यात कराड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
