अतिवृष्टीग्रस्त गावांना आपत्ती व्यवस्थापनातून निधी द्या खा. नीलेश लंके यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Share

अहिल्यानगर : प्रतिनिधी

     नगर तालुक्यातील विविध गावांमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे पायाभूत सुविधांची हानी झाली असून त्याची दुरूस्ती व सुशोभीकरणासाठी आपत्ती व्यवस्थापनातून निधी मंजूर करण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
      यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना  देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, नगर तालुक्यातील गावांमध्ये झालेली अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे पूरस्थिती निर्माण होउन सार्वजनिक मालमत्तेस मोठया प्रमाणात नुकसान पोहोचले आहे. या आपत्तीमध्ये रस्ते, पुल, स्मशानभुमी, बंधारे, घाट, वस्ती जोड रस्ते इ. पायाभुत सुविधांचे मोठे नुकसान झाले असून त्यामुळे सबंधित ग्रामस्थ मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
 
    सादर करण्यात आलेली ग्रामपातळीवरील कामे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत पूर, चक्रीवादळ इत्यादी आपत्ती व्यवस्थापन, पूर नियंत्रण व दुरूस्तीअंतर्गत प्रस्तावित करता येतील याकडे खा. लंके यांनी या निवेदनात जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. 
    ही कामे मार्गी लावल्यानंतर या गावांतील ग्रामस्थांना सोयी-सुविधा मिळणार असून ग्रामस्थांचे पुनर्वसन, सुरक्षित प्रवास आणि अंत्यसंस्कार, धार्मिक विधींसाठी सुविधा उपलब्ध होतील. त्यामुळे या कामांच्या निधीसाठी आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत तातडीने मंजुरी देण्यात यावी व कार्यवाहीस गती देण्यात यावी अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी केली आहे. 
     या निवेदनामध्ये खा. लंके यांनी पुढील गावांमध्ये विविध कामे प्रस्तावित केली आहेत. 

सारोळा कासार

स्मशानभूमी दुरूस्ती व सुशोभीकरण, काळे वस्ती येथील दोन पुलांची दुरूस्ती, दशक्रिया विधी घाट दुरूस्ती व सुशोभिकरण, बारे मळा शाळेसमोरील परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे, दत्त मंदिरासमोरील परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे, सारोळा गावठाण ते कडूस वस्ती रस्ता दुरूस्ती करणे.

अस्तगांव

स्मशानभूमी दुरूस्ती व सुशोभिकरण

स्मशानभूमीशेजारील रस्ता व सीडी वर्क, अस्तगांव गावठाण ते तरोडी रस्ता दुरूस्ती, गावठाण ते गाढवे वस्ती रस्ता दुरूस्ती.

खडकी

स्मशानभुमी दुरूस्ती व सुशोभिकरण, खडकी ते जाधव मळा रस्ता व सीडी वर्क, खडकी सोसायटी ते नगर दौंड महामार्ग रस्त्याचे काँक्रीटीकरण.

वाळकी

वाळकी ते गुंडेगाव रस्ता व सीडी वर्क, गावठाण ते अमरधाम रस्ता दुरूस्ती, जुंदरे मळा रस्ता दुरूस्ती, बोठे वस्ती, जुंदरे वस्ती, अमरधाम जवळील बंधारे दुरूस्ती.

भोरवाडी

वडवस्ती ते खैरे वस्ती रस्ता दुरूस्ती, नवीन खडकवाडी पूल दुरूस्ती व सीडी वर्क, गावठाण ते घुले वस्ती रस्ता दुरूस्ती.

अकोळनेर

गावठाण ते मेहेत्रे वस्ती रस्ता व ३ ठिकाणी सीडी वर्क, जाधववाडी रस्त्यावर २ ठिकाणी सीडी वर्क, दरोडी मळा, थोरात वस्ती, देशमुख मळा रस्ते दुरूस्ती.

सोनेवाडी

सोनेवाडी-जाधववाडी रस्त्यावरील पुल, सीडी वर्क, बोगरे हॉस्पिटल ते कुबाडे मळा रस्त्यावरील सीडी वर्क, दरेवस्ती, पाटील मळा, गोपळ वस्ती, दळवी वस्ती येथे सीडी वर्क.

Related Articles

ताज्या बातम्या