मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील शैक्षणिकदृष्ट्या प्रगत आणि सर्वाधिक पटसंख्येची असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव तर्फे महाळुंगे व आंबेगाव तालुक्यातील प्रत्येक केंद्रानुसार सर्वाधिक पटसंख्या असलेल्या इतरही शाळा “पुणे मॉडेल स्कूल” योजनेतून वगळण्यात आल्या असल्याने यासंदर्भात युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर यांनी आज महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची मंत्रालय, मुंबई येथील त्यांच्या दालनात भेट घेऊन सदर प्रकरणाविषयी सविस्तर चर्चा केली.

या भेटीत सचिन बांगर यांनी तालुक्यातील सर्वाधिक पटसंख्या असणाऱ्या शाळा, शैक्षणिक गुणवत्ता आणि स्थानिक सहभाग या बाबींचा सविस्तर आढावा मांडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी पिंपळगाव तर्फे महाळुंगे शाळा एक आदर्श ठरत असतानाही, “पुणे मॉडेल स्कूल” योजनेच्या यादीतून तिचा वगळण्यात येणे ही अन्यायकारक बाब आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, या निवड प्रक्रियेत अपारदर्शकता, वशिलेबाजी झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ, शिक्षक व पालक करत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
सचिन बांगर यांनी मंत्र्यासमोर तीन प्रमुख मागण्या ठामपणे मांडल्या – (१) आंबेगाव तालुक्यातील “पुणे मॉडेल स्कूल” निवड प्रक्रियेची चौकशी व्हावी, (२) गुणवत्ताधारित आणि सर्वाधिक पटसंख्या असलेल्या शाळांची फेरचौकशी करून केंद्रनिहाय नव्याने यादी तयार करावी, (३) पिंपळगाव तर्फे महाळुंगे शाळेला योजनेत तात्काळ समाविष्ट करून आवश्यक निधी मंजूर करावा.

या चर्चेची गंभीर दखल घेत मंत्री दादा भुसे यांनी पटसंख्येबाबत त्वरित संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून योग्य चौकशी करून निर्णय घेण्याचे आश्वासन बांगर यांना दिले. गुणवत्ताधारित शाळांना अन्याय न होता, त्यांच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
