शिक्षकांचा मार आणि शाबासकीची थाप. वाकेश्ववर विद्यालयात माजी विद्यार्थी रंगले आठवणीत.

Share

मंचर

शालेय जीवनात शिक्षण घेणारे सर्व जुने विद्यार्थी, मित्र आणि त्यांना शिस्तीचे धडे देणारे तेच शिक्षक तब्बल 23 वर्षानंतर एकत्र आले. ( पेठ ता. आंबेगाव) येथील श्री वाकेश्वर विद्यालयातील सन 2002 या वर्षी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपला सत्कार करुन आदर व्यक्त करणे, हा जीवनातील सर्वात मोठा आनंद असल्याची भावना तत्कालीन शिक्षक रामचंद्र तरंगे यांनी व्यक्त केली.


दहावीपर्यंत एकाच वर्गात खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण घेणारे विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या शाळा, कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यावेळी विद्यार्थ्यांना घडवणारे शिक्षक आता सेवानिवृत्त झाले आहेत. आपली नोकरी, व्यवसाय आणि वैवाहिक जीवनात रमलेल्या 2002 च्या दहावी बॅचचे ते विद्यार्थी तब्बल 23 वर्षांनंतर एकत्र आले होते. आपले विद्यार्थी हे विविध क्षेत्रात कार्यरत आहेत, याचा आनंद आणि बऱ्याच वर्षाच्या भेटीगाठीने विद्यार्थ्यांसह शिक्षकही भारावले.


कार्यक्रमाच्या सुरवातीस हयात नसलेले शिक्षक व आपले काही वर्गमित्र यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर उपस्थित शिक्षकांचा सत्कार करत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. 23 वर्षांनी ऐकमेकांना भेटणाऱ्या मित्रांच्या चेहऱ्यावर उत्सुकता, आनंद, मस्ती अशा संमिश्र भावना होत्या.
यावेळी उपस्थित असलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देताना शाळेतल्या गमतीजमती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

तसेच समाजात वावरताना एकमेकांना आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. शाळेतील सवंगडी, शाळेचा वर्ग, लाकडी बाक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते. शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकांवर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच. म्हणूनच अशा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात यावी अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली.


यावेळी विद्यार्थ्यांशी उपस्थित शिक्षकांनी संवाद साधत पर्यावरणाचे महत्व समजून घेवून त्याचा ऱ्हास होणार नाही अशी काळजी सर्वांनी घ्यावी यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांना एक झाडाचे रोपटे व निसर्गाबद्दल अधिक माहिती सांगणारे एक पुस्तक शिक्षकांच्या हस्ते भेट देण्यात आले.
यावेळी बोलताना शिक्षक रमेश राजगुरू म्हणाले, २3 वर्षानंतर सर्व विद्यार्थ्यांना पाहून निश्चित आनंद वाटला.

सर्व विद्यार्थी आपआपल्या क्षेत्रात काम करत आहेत, याचा फायदा समाजातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना होण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी ठराविक निधी जमा करून त्या निधीचा उपयोग आपल्या शाळेसाठी किंवा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी करावा असे अवाहन यावेळी रमेश राजगुरू यांनी केले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितीन घनवट, अनिस तांबोळी, शोभा गायकवाड, दिपक आदक, संदेश पवळे यांसह सर्व माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. यावेळी शिक्षक रामचंद्र तरंगे, रमेश राजगुरू यांसह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ललिता काळे यांनी केले तर सुत्रसंचालन शोभा गायकवाड यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या