वळती, ता. २८
वळती येथील काटवानवस्तीत शुक्रवारी (दि. २७) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे एक लाख रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.ही घटना नकुबाई जयराम भोर (वय ८५) यांच्या घरी घडली असून त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने आपल्या धाकट्या मुलाच्या घरी राहण्यास गेल्या होत्या.
घटनेचा तपशील असा आहे की, वळती गावाच्या पूर्वेला सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या काटवनवस्तीत नकुबाई भोर यांचे घर आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या शेतीचा खंड शेतकऱ्याने दिला होता. तो खंड रक्कम (रु. १,००,०००) नकुबाई भोर यांनी कपाटात ठेवला होता.
दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रामहरी कोंडीभाऊ भोर व बबन जयराम भोर यांच्या घरांना बाहेरून कडी लावून टाकली. त्यानंतर नकुबाई भोर यांच्या घराचे कुलूप कटरच्या साहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट उघडून एक लाख रुपये रोख, पाकिटातील १५०० रुपये, तसेच दीड तोळ्याची सोन्याची बोरमाळ, अर्धा तोळ्याची नथ, तीन तोळ्यांच्या चांदीच्या मासोळ्या असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
शनिवारी सकाळी सहा वाजता बबन भोर यांनी शेजारील शेतकरी रामहरी भोर यांना फोन करून घराच्या कडी उघडण्यास सांगितले. मात्र त्यांच्या घरालाही कडी लावलेली असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ गोविंद भोर यांना याबाबत माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच वळती गावाचे पोलीस पाटील प्रकाश लोंढे यांनी मंचर पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानंतर सहायक फौजदार एस. आर. मांडवे, पोलीस कॉन्स्टेबल पी. एस. गवारी व मोमीन यांनी घटनास्थळी भेट देऊन घरफोडीचा पंचनामा केला.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
