मंचर प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या असून अनेक नवीन राजकीय समीकरणे जुळत आहेत. असेच समीकरण पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये जुळू पाहत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिंदेंच्या शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख यांनी एकत्रित येऊन गुप्तगु केल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही शिवसेना एकत्रित लढण्याची चर्चा सुरू झाली आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये महायुती व महाविकास आघाडीमध्ये लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या सरळ लढती झाल्या. यामध्ये शिंदेंची शिवसेना व उद्धव ठाकरेंची शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढल्या त्याचा तोटाही या दोन्ही शिवसेना यांना सोसावा लागला आहे.

म्हणूनच की काय उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे यांची शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्था एकत्रितपणे लढवणार असल्याची चर्चा पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरू झाली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. नुकतेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राजाराम बाणखेले ठाकरेंच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन भालेराव आणि शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख देविदास दरेकर तालुकाप्रमुख प्रवीण थोरात पाटील युवा सेना तालुकाप्रमुख वैभव पोखरकर यांनी एकत्रित येत आंबेगाव विधानसभेच्या राजकीय गणितांची आखणी केल्याची चर्चा आहे.
त्यामुळे राज्यात दोन्ही शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढत असल्या तरी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना काहीतरी नवीन राजकीय गणित जुळवत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
या दोन्ही शिवसेना एकत्रित येण्याला निमित्त ठरले आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा झालेला मेळावा. त्या मेळाव्यामध्ये झालेल्या टीकेला दोनही पक्षातील शिवसेनेने गंभीरतेने घेतले असून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुणे जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुका एकत्रित लढवण्यासाठीची चाचपणी सुरू केली आहे. या दोन्ही शिवसेनेतील वाटाघाटी सकारात्मक रित्या पुढे गेल्यास शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय ,वंचित बहुजन आघाडी, बिरसा बिग्रेड, भारतीय किसान सभा असे राजकीय पक्ष व संघटनांना एकत्रित करून आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढण्याची रणनीती तयार केली असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील दोन नेते माजी मंत्री आमदार दिलीपराव वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध सर्व राजकीय पक्ष एकत्रित येऊन लढण्याची रणनीती तयार केली जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

एकंदरीत आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे राजकारण पाहता 2004 साली तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे आंबेगाव तालुका अध्यक्ष उद्योगपती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेना पक्षात प्रवेश केला होता . त्यानंतर शिवसेना पक्षातून तीन वेळा खासदार होण्याचा मान त्यांना मिळाला. नंतर झालेल्या राजकीय स्थितांतरामध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. येथे काही काळ राहिल्यानंतर 2024 ची लोकसभा निवडणूक ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून महायुतीकडुन लढले या निवडणुकीत त्यांचा पराभव महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केला. त्यानंतर आढळराव पाटील यांनी माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांना विधानसभेत निवडून आणण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आढळराव पाटील,व वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरवण्याची तयारी करत असताना. आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात केलेले भाषण त्यामध्ये विरोधकांना दिलेली कौरवांची उपमा यामुळे दोन्ही शिवसेनेतील नेते शिवसैनिक आढळराव पाटील व वळसे पाटील यांच्या विरोधात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका विरोधकांना एकत्रित घेऊन लढतील.आणि दोन्ही नेत्यांपुढे राजकीय आव्हान उभे करतील अशी सूत्रांची माहिती आहे .
आगामी काळात दोन्ही शिवसेनेने एकत्रित येऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवण्याचे दिलेले संकेत वरिष्ठ पातळीवर त्याला कशी संमती मिळणार यावरच ठरतील ..? की वरिष्ठांचे आदेश झुगारून आंबेगाव तालुक्यात अनोखी आघाडी जन्माला येईल हे आगामी काळाच ठरवेल
