महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होणार..

Share

मुंबई (प्रतिनिधी)

महायुतीने महाराष्ट्रात एक हाती सत्ता मिळवल्यानंतरही मुख्यमंत्री कोण होणार..? हे महाराष्ट्रातील जनतेला अद्याप समजलेलं नाही. त्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नाही. असेच बोलले जाते आहे. आज रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यामध्ये खलबते सुरू असून दिल्लीत आज रात्री उशिरा मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर एकमत होणार असल्याची शक्यता आहे .तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला तगडी व जास्त मंत्रीपदे मिळतील. अजित पवारांनी बिनशर्त पाठिंबा दर्शविला असल्याने त्यांना चांगल्या खात्यांवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद द्यावे अशी मागणी शिवसेनेचे आमदार करत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने आपला पाठिंबा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना दिलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये किंवा त्यांची बार्गेनिग पावर कमी व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने डाव करत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा दर्शवला आहे .

२०१९च्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार असताना एकनाथ शिंदे यांनी रिस्क घेत उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेतली आणि मोठे पाऊल उचलत चाळीस आमदारांसह पक्ष सोडला.शिंदेमुळे भाजपा पक्ष सत्तेत आला. महाविकास आघाडी भरभक्कम असताना पुन्हा महाराष्ट्रात भाजपा सत्तेत येऊ शकणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे भाजपाच्या मदतीला धावले त्यांनी भाजपाला महाराष्ट्रात साथ देत सत्ताही मिळवून दिली.
त्याच्या बदल्यात शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिले गेले 2024 च्या विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढवल्या गेल्या आणि त्या बहुमताने जिंकले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील .अशी शक्यता असताना त्यांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांच्या म्हणण्यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार असल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे .

दिल्लीत तोडगा निघणार

आता गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत सुरू असलेल्या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उप माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यामध्ये बैठक सुरू असून या बैठकीत मुख्यमंत्री पदावर एकमत होऊन देवेंद्र फडणवीस यांचेच नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. ही घोषणा थोड्याच वेळात होईल किंवा अधिकृतरित्या भाजपाकडून उद्या सकाळी जाहीर केली जाईल

एकनाथ शिंदे घेणार मोठी खाती

भाजपाने मुख्यमंत्री पद स्वतःकडे घेत देवेंद्र फडणवीस यांना या पदावर बसवल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली ताकद पणाला लावून मुख्यमंत्रीपद सोडल्याच्या बदल्यात गृह किंवा अर्थ, सार्वजनिक बांधकाम, नगर विकास, महसूल यासारख्या तगड्या खात्यांना आग्रह धरतील आणि तो आग्रह भाजपाला पूर्ण करावा लागेल. नाहीतर उद्धव ठाकरेंना ज्याप्रमाणे भाजपाने फसवले त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेनाही फसवले अशी चर्चा रंगू शकते .

अजित पवारांना फटका

अजित पवारांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा भाजपाला देत देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करा. अशी घोषणा केल्याने आता सुरू असणाऱ्या बैठकीत अजित पवार यांना फटका बसू शकतो. कारण त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिल्याने त्यांच्याकडे सध्या असलेल्या सगळ्या खात्यांपैकी काही खाती त्यांना शिवसेना पक्षाला सोडायला लागू शकतात

देवेंद्र फडणवीसच बॉस..

आज सर्वच बाबींवर चर्चा होऊन महायुती मधला गोंधळ मिटवला जाईल. देवेंद्र फडणवीस यांनाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून घोषित केले जाईल.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाकलेल्या डावामुळे ते बार्गेनिंग करून जास्तीची वजनदार खाते स्वतःच्या पदरात पाडून घेतील. मुख्यमंत्रीपद भेटत असल्याने भाजपा त्यांच्या तडजोडीला मान्यता देईल. आणि महाराष्ट्राला पुढचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच भेटतील अशी चर्चा आहे.

Related Articles

ताज्या बातम्या