महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांचा पराभव.. या कारणांमुळे

Share

जुन्नर प्रतिनिधी

जुन्नर विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा पराभव झाला.महायुतीचाही पराभव झाला. या ठिकाणावरून अपक्ष माजी आमदार शरद सोनवणे हे विजयी झाले. महाविकास आघाडीचे सत्यशील शेरकर व महायुतीचे आमदार अतुल बेनके यांनी विजयाचे दावे केले होते .ते फोल ठरले आहेत. गुरुवारी जुन्नर येथे पराभवाचे चिंतन करण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक नारायणगाव येथे आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत महाविकास आघाडीचे उमेदवार यांचा पराभव ईव्हीएम घोटाळ्यामुळे न होता सत्यशील शेरकर यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी नियोजन न केल्याने झाला .अशी तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जाहीर रित्या बोलून दाखवली. राज्यात महाविकास आघाडी पराभवाचा ठपका ईव्हीएम ठेवत असताना जुन्नरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेमक्या मुद्द्यावर बोट ठेवले आहे.

जुन्नर विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची उमेदवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळावी यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते आग्रही होते. खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी ताकद लावून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळवली‌ राष्ट्रवादी काँग्रेसकडे
सक्षम उमेदवार नसल्याने त्यांनी काँग्रेस मधून सत्यशील शेरकर यांना घेऊन उमेदवारी दिली. सत्यशील शेरकर हे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असल्याने ते शेतकऱ्यांशी जोडलेले आहेत. त्यांचा संपर्क आहे असे सांगितले जात होते. त्यामुळे ते विजय होतील असा विश्वास खासदार कोल्हे यांना होता. त्यांच्या विरोधात असणारे महायुतीचे उमेदवार अतुल बेनके ,अपक्ष शरद सोनवणे यांनीही प्रचाराचे नियोजन योग्य केलं होते. त्यांच्या तुलनेत महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांचे नियोजन कमकुवत असल्याची तक्रार आज आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या आभार सभेत कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

राज्यात महाविकास आघाडी ईव्हीएम वर ठपका ठेवत असताना जुन्नर विधानसभेत मात्र महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याच कार्यकर्त्यांवर ठपका ठेवून आपल्या पराभवाला आपणच जबाबदार असल्याचे कबूल केले आहे.

महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीची झालेली दयनीय अवस्था आणि त्या अवस्थेत हक्काच्या मतदारसंघांमध्ये झालेला पराभव यामुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. जुन्नर तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद मोठी आहे. जागावाटपाच्या गोंधळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ही जागा ताकद असूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडावी लागली त्याचा परिणाम महाविकास आघाडीच्या पराभवमध्ये झाल्याचे चित्र दिसत आहे.

सत्यशील शेरकर ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्याने त्यांचा चेहरा चांगला असूनही निवडणुकीचा अनुभव नाही कार्यकर्त्यांचे फळी त्यांच्याकडे नव्हती. डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारामध्ये जुन्नर मध्ये उत्साह आणि नियोजन होते ते विधानसभा निवडणुकीत दिसले नाही. त्याचा परिणाम अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांना जुन्नरकरांनी पसंती दिली

सत्यशील शेरकर यांनी मानले आभार

महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या आभार सभेत महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार सत्यशील शेरकर यांनी आज उपस्थित महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. पराभवाने खचून न जाता पुन्हा एकदा जुन्नर तालुक्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व निर्माण करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. मन लावून काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे शेरकर यांनी आभार मानले

शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनीही मानले आभार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जुन्नर तालुक्यात मजबूत असल्याने या पक्षाला उमेदवारी मिळाली असती तर माऊली खंडागळे सारखा निष्ठावंत शिवसैनिक आमदार म्हणून जुन्नर विधानसभेमध्ये दिसले असते. अशा आशयाची चर्चा दबक्या आवाजात मेळाव्यामध्ये आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये दिसत होती. सत्यशिल शेरकर यांच्याकडे असलेला कमी अनुभव त्या तुलनेत माऊली खंडागळे यांच्याकडे असलेला प्रदीर्घ राजकीय अनुभव त्याचा फायदा त्यांना झाला असता. सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी म्हणून माऊली खंडागळे यांना जुन्नरकरांनी स्वीकारले असते अशी उपस्थितांमध्ये चर्चा होती. या चर्चेला माऊली खंडागळे यांनी उत्तर देत वरिष्ठ पातळीवर जो निर्णय झाला त्या निर्णयाला अनुसरून आपण चांगल्या प्रकारे निवडणूक लढवून नियोजन केले या नियोजनामध्ये आपण कमी पडलो असलो तरी त्याचा दोष कोणालाही देता येणार नाही. असे म्हणत त्यांनी उपस्थितांचे आभार मानले .

खासदार अमोल कोल्हे यांची उणीव

जुन्नर येथे विधानसभा निवडणूक सुरू असताना खासदार अमोल कोल्हे यांच्यावर राज्यातील स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी निश्चित होती. त्यामुळे ते मतदारसंघात कमी दिसले त्याचा परिणामही जुन्नर येथील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पराभवाला जबाबदार आहे का ..? अशी चर्चा सध्या जुन्नर विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरू आहे. खासदार कोल्हे यांना पुन्हा खासदार करण्यासाठी सत्यशील शेरकर माऊली खंडागळे यांनी जीवाचे रान करून लोकसभेला त्यांच्या प्रचाराचे काम केले होते. विधानसभा निवडणुकीत मात्र खासदार कोल्हे यांनी विधानसभा मतदारसंघांमध्ये अगदी कमी वेळ दिल्यामुळे त्याचाही महाविकास आघाडीचा उमेदवारांच्या पराभवांमध्ये वाटा असल्याचे राजकीय विश्लेषक बोलत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या