मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला भक्कम असे बहुमत मिळाले आहे .त्यामुळे लगेचच मुख्यमंत्री ठरवला जाईल असे वाटत होते. आठ दिवस उलटून गेले तरी अद्याप मुख्यमंत्री ठरला नाही. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणारे देवेंद्र फडणवीस यांचे नाव फायनल झाले आहे.अशी चर्चा आहे.
एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा दिल्ली मधून अमित शहा करतील असे चित्र असताना अचानक मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या दरेगावी जाऊन मुक्काम ठोकला आहे .देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद भेटू नये म्हणून या हालचाली सुरू आहेत का? अशी चर्चा महाराष्ट्रात रंगू लागली आहे
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये भाजपा सत्तेत यावी म्हणून गेली पाच वर्ष अनेक राजकीय डाव टाकले. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यातील आमदार फोडुन भाजपाची सत्ता महाराष्ट्रात आणली.
त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला चांगले यश मिळाले नसले तरी विधानसभेला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुतीने प्रचंड असे यश मिळवले आहे.
या यशाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीसच आहेत. त्यांना वरिष्ठांकडून मुख्यमंत्रीपद बहाल केले जाईल असे बोलले जात होते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ही त्यांना पाठिंबा दिला होता.
पण अचानक दिल्लीत अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव फायनल झाले असल्याची चर्चा सर्वत्र पसरली होती .दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दरेगावी जाणे पसंत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे .
शिंदे यांच्या पक्षाला गृहमंत्री पाहिजे असल्याची चर्चा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाला विरोध न करता त्यांच्या पक्षाला गृहमंत्री पद पाहिजे आहे. यासाठी हट्ट धरला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार अर्थमंत्री असताना आम्हाला निधी दिला जात नाही
अशी ओरड करत एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांसोबत सरकारमधून बाहेर पडले होते. उद्धव ठाकरेंना धक्का दिला होता. पुढे अजित पवार महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले.एकनाथशिंदे यांनी जी ओरड केली होती ती त्यांना मागे घ्यावी लागली कारण अजित पवार यांना पुन्हा महामुतीच्या सरकारमध्ये अर्थमंत्रीपद देण्यात आले. या सरकारमध्येही पुन्हा अजित पवार यांच्याकडेच अर्थमंत्रीपद जाणार असल्याने शिंदे काहीसे नाराज आहेत. शिवाय ते गृहमंत्री पदासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे .
एकनाथ शिंदे यांच्या नाराजी आडून देवेंद्र फडणीसांवर नेम लावला जातो आहे का..?
एकनाथ शिंदे दरेगाव गेल्याने ते नाराज आहेत . शिंदे गृहमंत्री पद भेटत नसल्याने नाराज आहेत. की महाराष्ट्रात मराठा मुख्यमंत्री भेटावा यासाठी काही लोक शिंदेंच्या आडून फडणीसांना विरोध करत आहेत .
काही शक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी मराठा चेहरा बसवण्यासाठी हालचाली करत आहेत का?अशीही चर्चा दबक्या आवाजात आहे. एवढे मोठे बहुमत असताना सहजतेने मुख्यमंत्री निवडणे भाजपा महायुतीला शक्य होते. मात्र ते घडताना दिसत नाही. यावरून विरोधकांना आयते क कोलीत भेटले आहे .
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पदाचे दावेदार
देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 19 या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून घेतलेले निर्णय आणि केलेले काम हे महाराष्ट्रासमोर आहे.उत्तम प्रशासक पक्षातील उत्तम पकड, वरिष्ठांशी असणारा संवाद आणि विरोधकांना हाताळण्याची हातोटी यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कारभाराने ठसा उमटवलेला आहे .
त्याला अजितं पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ही साथ असल्याने देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील. अशी शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होऊ न देण्यासाठी काही डावपेच टाकले जात आहेत का..? हे येणाऱ्या काळात महाराष्ट्राला पाहायला मिळेल
