अपहरण करून बेदम मारहाण झाल्याची तक्रार,
नगरसेवक युवराज पठारेसह पाच जणांविरोधात गुन्हा

पारनेर : प्रतिनिधी
गणपती देवस्थानच्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी केल्याच्या रागातून पारनेर नगरपंचायतीचा नगरसेवक युवराज पठारे व इतरांनी देवस्थान समितीच्या सदस्याचे अपहरण करून त्यास बेदम मारहाण केल्याची घटना गुरूवारी घडली. मस्साजोग प्रकरणाला साजेशा या घटनेमुळे पारनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी नगरसेवक युवराज पठारे हा भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पारनेरचे आमदार अजित पवार गटाचे आमदार काशिनाथ दाते यांचा निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे.
यासंदर्भात सुनिल भाऊसाहेब चौधरी रा. डिकसळ, हल्ली राहणार गणपती फाटा, गौरीनंदन मंगल कार्यालय, पारनेर यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे. की, चौधरी हे लोकजागृती सामाजिक संस्थेमध्ये सामाजिक काम करतात. पारनेर शहरातील गणपती देव देवस्थानचे ते सदस्य आहेत. पारनेर शहरात पारनेर-सुपा रस्त्यालगत या देवस्थानची तब्बल ३६ एकर जमीन आहे.
फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे की, देवस्थानच्या जागेवर युवराज कुंडलीक पठारे, नामदेव पठारे व बाळासाहेब पठारे व इतरांनी अतिक्रमण केलेले आहे. अतिक्रमण काढावे म्हणून सन २०१८ मध्ये देवस्थानच्या ट्रस्टींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होउन न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पारनेर नगरपंचायतकडे हे अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. सात दिवसांपूर्वी नगरपंचायतीच्या वतीने अतिक्रमणधारकांना या नोटीस बजाण्यात आल्या होत्या. नोटीस बजावल्यानंतर पारनेरच्या न्यायालयात युवराज पठारे याची भेट झाली त्यावेळी त्याने आपणास भेटून यात पडू नकोस नाहीतर तुला जीवे मारून अशी धमकी दिली होती. असे सुनिल चौधरी यांनी फिर्यादीमध्ये नमुद केले आहे.
सात दिवसांची नोटीस देण्यात येऊनही अतिक्रमण न काढल्याने गुरूवार दि.२६ डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सचिव सुधीर देवीदास पाठक यांच्या सांगण्यावरून सुनील चौधरी हे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनय शिपाई यांच्याकडे गेले होते. शिपाई यांच्या दालनामध्ये अतिक्रमणासंदर्भात चर्चा सुरू असताना युवराज पठारे व इतर दोन इसम तिथे आले व तुझा इथे येण्याचा काय संबंध ? तु यामध्ये पडू नको नाहीतर मी तुला जीवे मारील अशी धमकी मुख्याधिकारी शिपाई यांच्यासमोर युवराज पठारे याने दिल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे.
युवराज पठारे याच्या धमकीनंतर सुनिल चौधरी याने मी देवस्थानचा ट्रस्टी आहे असे सांगताच मुख्याधिकारी शिपाई यांच्यासमक्ष मी याला आता उचलून घेऊन जाणार आहे, त्याला तिकडेच मारून टाकतो, आज याचा विषय संपवितो अशी धमकी देत युवराज याने सुनिल याची गचांडी धरली तर इतर दोघांनी नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांसमक्ष उचलून कार्यालयाबाहेर आणले.
सुनिल चौधरी यास कार्यालयाबाहेर आणल्यानंतर तिथे उभ्या असलेल्या काळया रंगाच्या थार जीपमध्ये बसविण्यात आले. त्याला युवराज पठारेसह इतरांनी जीपमध्येच मारहाण करण्यास सुरूवात करण्यात आली. त्यानंतर जीप युवराज पठारे याच्या घराकडे नेण्यास चालकाला सांगण्यात आले. पठारे यांच्या घरी गेल्यानंतर एका खोलीत कोंडून मारहाण करण्यास सुरूवात करण्यात आली. जवळचा मोबाईल काढून पोलीसांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता युवराज याने मोबाईल हिसकावून घेतला. मोटारसायकलची चावी, पैशांचे पाकीटही काढून घेण्यात येऊन युवराज कुंडलिक पठारे, त्याचा भाऊ यशवंत उर्फ आबा कुंडलिक पठारे, चुलते बाळासाहेब पठारे, युवराजचे वडील कुंडलिक पठारे व युवराजची पत्नी व इतर सात ते आठ जणांनी बेदम मारहाण केली.
मारहाण सुरू असताना युवराज पठारे हा याला जिवंत सोडू नका असे म्हणत होता. मारहाणीत सुनिल चौधरी याच्या तोंडास, डोक्यास, उजवा हात, उजव्या पायाचा गुढगा, पोटरी, छाती व पाठीस मार लागलेला आहे. मारहाणीनंतर युवराज पठारे याने तुझा वकील भाऊ उन्मेश हा आमच्या विरोधात कोर्टात केसेस लढतो आता तुला व तुझ्या भावालाही संपवतो असा दम दिल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे.
सुनिल चौधरी याचे अपहरण करून त्यास मारहाण सुरू असल्याची माहीती पोलीसांना समजल्यानंतर पोलीसांनी युवराज पठारे याच्या घरी येत सुनिल चौधरी यास ताब्यात घेण्यात आले. पोलीस आल्यानंतर याने घरात चोरी केली आहे त्याला घेऊन जा असे पठारे परिवारातील सदस्य सांगत होते असेही या फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे.
