मंचर प्रतिनिधी
नुकत्याच विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या असून आगामी काळात त सहकार क्षेत्रातील निवडणुका जाहीर होतील आणि त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित होण्याची कुणकुण लागली की काय..? त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
पुणे जिल्ह्यातील मंचर नगरपंचायत निवडणूक लवकरच जाहीर होईल अशी चर्चा आहे त्या दृष्टीने इच्छुकांनी आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मंचर शहरांमधून महायुतीचे उमेदवार माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांना चांगले मताधिक्य मिळाले आहे .
त्यामुळे महायुतीकडून अनेक इच्छुक दावे करत आहेत. तर महाविकास आघाडीकडून कमी मतदान पडल्याने इच्छुकांची संख्या कमी आहे. महायुतीकडून भाजपाचे किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष संजय थोरात राष्ट्रवादी काँग्रेसकडुन सुहास बाणखेले माजी ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल बेंडे पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप उर्फ लक्ष्मण थोरात भक्ते पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य धनेश मोरडे हे इच्छुक आहेत.तर महाविकास आघाडीकडुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडुन माजी पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले,माजी सरपंच शिवसेना उबाठा पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्ता गांजाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य वसंत बाणखेले, काँग्रेस पक्षाकडून तालुकाध्यक्ष राजु इनामदार इच्छुक आहेत.
मंचर नगरपंचायत निवडणुका कधी लागणार हे अद्याप निश्चित नसले तरी नगराध्यक्ष होण्यासाठी आप आपल्या पक्षांच्या नेत्यांकडे सेटिंग लावण्यासाठी कार्यकर्ते वेगवेगळ्या आयडिया लढवत आहेत . नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणारे काही उमेदवार हवेत आहेत.. तर काही उमेदवार जमिनीवर राहुन मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत.
महायुतीकडुन नगराध्यक्ष पदाचे प्रबळ इच्छुक असणारे भाजपा किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष संजय थोरात यांनी कामाला सुरुवात केली आहे .ते लोकांची कामे करुन आपला प्रचार करत आहेत.महायुतीची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी संजय थोरात यांना मिळाल्यास ते भाजपाचा झेंडा मंचर नगरपंचायतवर फडकवु शकतात..? तर महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे दुसरे इच्छुक स्वप्निल बेंडे पाटील यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा शब्द दिला आहे का? याबाबतही चर्चा सुरू आहे.
महायुतीकडुन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी तिसरे इच्छुक सुहास बाणखेले यांचेही काम सुरू आहे. सुहास बाणखेले नेहमीच लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असतात. महायुतीचे चौथे इच्छुक सुनिल बाणखेले यांनीही जुळवा जुळव सुरू केली आहे.
तर महाविकास आघाडीकडुन माजी सरपंच शिवसेना उबाठा पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्ता गांजाळे व शिवसेनेचे नेते माजी पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले हे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीकडुन मुख्य दावेदार आहेत. असे असले तरी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांना पडलेली कमी मते आणि निसटत्या मतांनी देवदत्त निकम यांचा झालेला पराभव यांचा फटका शिवसेना उबाठा पक्षाच्या उमेदवारांना बसणार असल्याची चर्चा मंचर शहरांमध्ये चौकाचौकांमध्ये होताना दिसते आहे.
शिवसैनिक ठरवणार मंचरचा नगराध्यक्ष..?
शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या मंचर शहरामध्ये लोकसभा निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात जोमाने काम करणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीत देवदत्त निकम यांचा प्रचार जोमाने करताना दिसले नाहीत. त्यामुळे देवदत्त निकम यांना मंचर शहरांमधून फटका बसला अशी चर्चा आहे. त्यामुळे नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत या निवडणुकीत कोणत्या इच्छुकांने काय भूमिका घेतली त्यावर त्यांचे राजकीय भविष्य अवलंबून आहे.असे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील निवडून यावे यासाठी प्रयत्न करणारे शिंदेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक अमोल कोल्हे यांना मंचर शहरांमधून चांगले मतदान झाल्याने अमोल कोल्हे यांचे काम करणार्या, कार्यकर्त्यांवर नाराज आहेत.
तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम निवडून यावे यासाठी प्रयत्न करणारे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिक यावेळी मंचर शहरांमध्ये देवदत्त निकम यांना कमी मते मिळाल्याने निकम यांच्याशी दगाफटका करणार्या कार्यकर्त्यांवर नाराज आहेत. हे दोन्ही शिवसेनेतील नाराज मंचरचा नगराध्यक्ष ठरवताना योग्य ठिकाणी मतदान करतील अशी चर्चा आहे.दोनही शिवसेनेचे शिवसैनिक ज्या उमेदवाराला मतदान करतील तोच उमेदवार निवडून येईल अशी राजकीय गणिते मंचर शहरांमध्ये सध्या तरी दिसत आहेत.
