पारनेर : प्रतिनिधी
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पारनेर तालुक्यात विक्रमी ४ हजार १४७ घरकुलांना मंजुरी मिळाल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली. प्रधानमंत्री घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत टप्पा क्र. ३ मध्ये ७९९ व टप्पा क्र.४ मध्ये ३ हजार ५२ घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून ३०० घरकुले मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत.
आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या गरजू नागरीकांचे घराचे स्वप्न घरकुले मंजुर झाल्याने होणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या कुटूंबाला घर मिळवून देणे, दारित्रय रेषेखालील कुटूंबांना स्थिर आणि सुरक्षित घरांची सुविधा पुरविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे खा. नीलेश लंके यांनी सांगितले.
पारनेर तालुक्यात घरकुलांची मोठया प्रमाणावर मागणी होती. यापूर्वी काही घरकुलांना मंजुरी मिळाली. यावर्षी मोठया प्रमाणावर घरकुलांना मंजुरी मिळाल्याने हजारो कुटूंबांच्या घरकुलाचे स्वप्न आता दृष्टीपथात आले असून त्यांचे जीवन साकार होऊन त्यांचे जीवनमान उंचावणार आहे. त्यांच्या जीवनात स्थैर्य येणार आहे यात समाधान असल्याचे लंके यांनी सांगितले.
एकूण मंजुर घरकुलांपैकी ३०० घरकुले मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असतील, इतर काही अडचणी असतील तर आपल्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन खा. लंके यांनी केले आहे.
पारनेर तालुक्यातील सर्व सरपंच, लाभार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी, गृहनिर्माण अभियंता, पंचायत समितीमधील सर्व संगणक चालक, विस्तार अधिकारी यांनी या घरकुलांच्या मंजुरीसाठी परीश्रम घेतले.
प्रथमच ४ हजारांवर घरकुले !
दुष्काळी पारनेर तालुक्यात घरकुलांची मागणी मोठी असणे साहाजिक असून आजवर मोठया प्रमाणावर घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली नव्हती. घरकुलांबाबत केंद्र सरकारने धोरण घेतल्यानंतर आपण प्रत्येक ग्रामपंचायतीशी संपर्क करून घरकुल लाभार्थ्यांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना दिल्या होत्या. आपल्या संपर्क कार्यालयाकडूनही वारंवार घरकुलांचे प्रस्ताव सादर करण्याबाबत विविध ग्रामपंचायतींकडे पाठपुरावा करण्यात येत होता. एकत्रीत प्रयत्नांतून तालुक्यात प्रथमच तब्बल ४ हजारांवर घरकुलांना मंजुरी मिळाली यात मोठे समाधान आहे.
खासदार नीलेश लंके
लोकसभा सदस्य
