मंचर (प्रतिनिधी) आंबेगाव तालुक्यातील मांदळेवाडी या ठिकाणी खाण उत्खननासाठी ग्रामपंचायतकडे मागितलेल्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी विरोध केला म्हणून मांदळेवाडी येथील अमोल मारुती ढगे यांना मारहाण केल्याने खाण व्यावसायिक व संविदणचे गावचे माजी सरपंच वसंत गहीणा पडवळ ,चेतन वसंत पडवळ,व गणेश रामा पोखरकर यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरण घडल्यानंतर कोणत्याही छोट्या-मोठ्या गुन्ह्यात कोणालाही पाठीशी न घालण्याची भूमिका गृह विभागाने घेतली असल्याचे दिसून येत आहे.
पारगाव कारखाना पोलीस स्टेशन हद्दीत मांदळेवाडी येथे खाण व्यवसायाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्याला मारहाण झाली म्हणून व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आग लावून आंब्याच्या झाडाचे व इतर नुकसान केले म्हणून अशा दोन तक्रारीं पारगाव कारखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत.
खाणव्यवसायाला ना हरकत प्रमाणपत्र देण्यास विरोध करणाऱ्या शेतकरी अमोल ढगे यांना मारहाण केल्याने व्यावसायिक व संविदणे गावचे माजी सरपंच वसंत गहिणा पडवळ यांच्यावर व चेतन वसंत पडवळ, गणेश रामा पोखरकर त्यांच्यावर गुन्हा रजिन22/2025 329(1)115(2)118(1)252 351 (3)189(4)191(2) 190प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पारगाव पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार 23 फेब्रुवारी 2025 रोजी अमोल मारुती ढगे वय वर्ष 30 राहणार मांदळेवाडी यांनी पारगाव पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार मादंळेवाडी ता आंबेगाव येथील जमीन गट नंबर 102 मध्ये आरोपी ग्रामपंचायत मांदळेवाडी येथे खाण उत्खननासाठी नाहरकत प्रमाणपत्र मागितले होते. या नाहरकत प्रमाणपत्राला व खाण उत्खननासाठी नाहरकत प्रमाणपत्र मागितलेल्या गट नंबरच्या आसपासच्या लोकांनी खाण उत्खननासाठी विरोध दर्शवला होता.
फिर्यादी अमोल ढगे यांचे बंधू विकास ढगे यांचे जमीन गट नंबर 102 मध्ये खाण उत्खननासाठी विरोध केल्याच्या कारणावरून यातील आरोपी वसंत गहीना पडवळ व चेतन वसंत पडवळ यांनी बेकायदेशीर गर्दी जमवून अमोल ढगे यांस शिवीगाळ दमदाटी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली .अशा आशयाच्या अमोल ढगे यांच्या फिर्यादीनुसार पारगाव पोलीस स्टेशनला सदर इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्यांचा तपास करून सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सब इन्स्पेक्टर भाऊसाहेब लोकरे यांनी तपास करुन वसंत गहिणा पडवळ, चेतन वसंत पडवळ गणेश रामा पोखरकर या तीन आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या तीनही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
