मंचर (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील मांदळेवाडी ( ता आंबेगाव) गावच्या हद्दीतील जमिनीमध्ये खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतने नाहरकत द्यावी. यासाठी वसंत गहिणा पडवळ व चेतन वसंत पडवळ यांनी केलेल्या अर्जाला प्रदुषण होऊन शेतीपिकांना नुकसान होईल. या कारणाने विरोध करणाऱ्या मांदळेवाडी येथील ग्रामस्थांना मारहाण,शेतीचे नुकसान करणे, या तक्रारीनुसार पारगाव कारखाना पोलिस स्टेशनमध्ये दोन गुन्हे तर शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारीचे व इतर नुकसान केले म्हणून शिरुर पोलिस स्टेशनमध्ये उद्योजक वसंत गहिणा पडवळ, चेतन वसंत पडवळ व गणेश रामा पोखरकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मांदळेवाडी ता आंबेगाव येथील बहुतेक शेतजमीन खडकाळ आहे. त्यामुळे येथील शेतजमिनी खाण व्यवसायासाठी उपयोगी येतील या उद्देशाने अनेक खाण व्यवसायिकांनी येथे जमिनी खरेदी केल्या आहेत. मात्र खाण व्यवसाय गावात सुरू झाल्यावर प्रदुषण,वाहतुकीचा त्रास, धुळीमुळे शेतीमालाचे नुकसान होईल या भीतीने मांदळेवाडी ग्रामस्थांनी कोणत्याही खाण व्यवसायिकाला खाण उत्खननासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शवला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की मांदळेवाडी( ता आंबेगाव) येथील ग्रामपंचायतने २६ जानेवारी २०२५ रोजी आयोजित ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये वसंत गहिणा पडवळ व चेतन वसंत पडवळ यांनी मांदळेवाडी गावच्या हद्दीत खाण उत्खननासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेल्या अर्जावर चर्चा होऊन १५७ ग्रामस्थांनी खाण व्यवसायाला नाहरकत देण्यास विरोध दर्शवला होता. यावेळी विठ्ठल ढगे यांनी वसंत पडवळ यांना तुम्ही तुमच्या संविदणे गावात खाण व्यवसाय सुरू करा. असे सांगितले असता वसंत गहिणा पडवळ यांनी मांदळेवाडी गावच्या ग्रामसभेत मांदळेवाडीच्या ग्रामस्थांनी आमच्या गावच्या हद्दीत विहीरी घेऊन तेथुन मोटारीने पाणी आणले आहे .हे लक्षात ठेवा. हे सांगुन एक प्रकारची धमकी दिली होती.
त्यामुळे वसंत पडवळ, चेतन पडवळ यांनी चिडुन जाऊन विठ्ठल ढगे पाटील यांच्या मालकीचे गट न १८३८ व १८३९ मधील विहीरीवरील १५ एच पी मोटार बॉक्स केबल आदीचे नुकसान गणेश रामा पोखरकर, वसंत गहिणा पडवळ, चेतन वसंत पडवळ यांनी केले असल्याची फिर्याद विठ्ठल ढगे पाटील यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये दिली होती. त्यानुसार या तीन इसमांवर बी एन एस 127(7) 3(5) 324,(5) 326(f) 49 नुसार २४ फेब्रुवारी रोजी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंबेगाव तालुक्यातील पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये अमोल ढगे यांच्या फिर्यादीवरून गणेश रामा पोखरकर, वसंत गहिणा पडवळ, चेतन वसंत पडवळ यांच्यावर गुन्हा रजिन 22/2025,329(1) 115(2) 118(1)252,351(3)189(4)191(2)190 प्रमाणे गुन्हा दाखल करुन पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तर पारगाव पोलिस स्टेशन हद्दीत दुसरा गुन्हा २४ फेब्रुवारी २०२५रोजी पारगाव पोलीस स्टेशनमध्ये निवृत्ती गेणुजी ढगे पाटील (वय ६३ )यांनी गणेश रामा पोखरकर, वसंत गहिणा पडवळ, चेतन वसंत पडवळ यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्याने त्यावरून पोलिसांनी तपास करून या तीन इसमांवर गुन्हा रजिन25/2025भा न्या सं कलम 326(फ) 3(5). नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
यामध्ये तक्रारदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश रामा पोखरकर, एक अनोळखी इसम, वसंत गहिणा पडवळ व चेतन वसंत पडवळ रा संविदणे यांनी मांदळेवाडी गावच्या हद्दीत गट नंबर 102 मध्ये आरोपीं बुलेट गाडीवरून आले. आणि फिर्यादी यांची आंब्याची झाडे पेटवून देण्याच्या उद्देशाने फटाक्याची माळ फेटवुन ती पेटती फटाक्याची माळ निवृत्ती गेणुजी ढगे पाटील यांच्या आंब्याच्या शेतात टाकली. त्यामुळे ढगे पाटील यांची २० ते २५०लहान मोठी झाडे जळुन,आंही लागुन लहान लहान आंबे मोहोर,व ठिबक सिंचनाचे पाईप जळुन अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याच्या मजकुरावरुंन गणेश रामा पोखरकर, वसंत गहिणा पडवळ, चेतन वसंत पडवळ,या तीन इसमांवर गुन्हा रजिस्टर करण्यात आला आहे.
पारगाव कारखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल असणाऱ्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सब इन्स्पेक्टर भाऊसाहेब लोकरे करत आहेत. तर शिरूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस सब इन्स्पेक्टर पवार करत आहेत.
