बारामतीतील उपविभागीय अधिकाऱ्यांकडून जनतेची कामे खोळंबली; ‘कारणे’ सांगून टाळाटाळ!

Share

बारामती, प्रतिनिधी:
बारामती उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे जनतेकडून दाखल झालेली अनेक प्रकरणे महिनोंमहिने प्रलंबित ठेवली जात आहेत. संबंधित अधिकारी वेळेवर निर्णय देत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अनेक नागरिकांनी तक्रार केली आहे की, अधिकारी प्रत्येक वेळी ‘दौरा होता’, ‘मंत्री आले होते’, ‘वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट होती’ अशा कारणांचा पाढा वाचत कामांना टाळाटाळ करत आहेत.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, अनेक महत्त्वाची प्रकरणे कार्यालयात ‘पेंडिंग’ असून, अधिकारी फक्त “निकाली काढतो” असे सांगून वेळ काढत आहेत. प्रत्यक्षात मात्र कामे ढकलली जात आहेत. “जनतेची कामे प्राधान्याने निकाली काढणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, परंतु येथे ती जबाबदारी झटकली जात आहे,” असा आरोप नागरिक करत आहेत.

यामुळे शेतकरी, महिला, वयोवृद्ध आणि गरजू नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. अधिकारी कार्यालयात असले तरी नागरिकांची कामे मार्गी लागत नाहीत. काही वेळा तर अधिकारी अचानक अनुपस्थित असतात, आणि कर्मचारी “साहेब बाहेर गेलेत” असे सांगून नागरिकांना रिकाम्या हाताने परत पाठवतात.

सार्वजनिक प्रशासकीय यंत्रणांमध्ये ही ढिसाळपणा खपवून घेतला जाणार नाही

सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक संघटनांनी यावर तीव्र निषेध नोंदवला आहे. “जर प्रशासनच जनतेला वेळेवर न्याय देणार नसेल, तर लोकशाहीचा अर्थ काय उरतो?” असा प्रश्न विचारत त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना तत्काळ जनतेची कामे निकाली काढण्याचे आवाहन केले आहे.
वारंवार कारणे सांगून कामे टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर वरिष्ठ स्तरावरून चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या