अहिल्यानगर : प्रतिनिधी
दूध हे शेतकऱ्यांसाठी केवळ उत्पादन नसून जोडधंदा आणि जीवन जगण्याचा अविभाज्य घटक आहे.मात्र आज दुधाला योग्य भाव मिळत नाही, उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने विक्री करावी लागत आहे. दुसरीकडे दुधात भेसळ करणारे लोक सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी थेट खेळ करत आहेत. या शेतकरी आणि ग्राहकांशी निगडित प्रश्नांवर इंडिया आघाडीच्या खासदारांनी मंगळवारी संसद भवनासमोर आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले. दुधाची दरवाढ आणि भेसळीविरोधात खासदार नीलेश लंके यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारने दोन्ही प्रशनावर तत्काळ निर्णय घेण्याची मागणी केली.
या आंदोलनात खासदार नीलेश लंके इंडिया आघाडीचे खासदार नामदेव किरसान, शोभाताई बच्छाव, बळवंतराव वानखेडे, छत्रपती शाहू महाराज, धैर्यशील मोहिते पाटील, श्याम बर्वे, संजय देशमुख, प्रियंका चतुर्वेदी, वर्षा गायकवाड, बजरंगबप्पा सोनवणे,अरविंद सावंत, डॉ.कल्याण काळे आदी सहभागी झाले होते.
खासदार नीलेश लंके व इतर खासदारांनी संसद भवनात आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले. यावेळी दूध भेसळीचा प्रतिकात्मक प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.
या आंदोलनादरम्यान खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. दुधाचे बाजारभाव वाढले पाहिजेत, दुधाचे दर उत्पादन खर्चाच्या आधारे ठरवले गेले पाहिजेत,भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, शेतकऱ्यांना त्यांच्या श्रमाचे योग्य मोबदला मिळाला पाहिजे अशी घोषणाबाजी करत खासदारांनी संसद भवन परिसर दणाणून सोडला.

आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार नीलेश लंके यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, हा लढा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी व सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी आहे. दुधाला बाजारभाव नसल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आहेत. महाराष्ट्रात दुधाला प्रतिलिटर ४० ते ४२ रुपये उत्पादन खर्च येतो. याचा विचार करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित दर मिळाले पाहिजेत ही आमची आग्रही मागणी आहे. दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असून, भेसळीमुळे विशेषतः लहान मुलांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना कठोर शासन झाले पाहिजे.
