मंचर प्रतिनिधी: परतीच्या पावसाने आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. लोणी, धामणी, जारकरवाडी, खडकवाडी, शिरदाळे, पहाडदरा, पोंदेवाडी, लाखणगाव आदी गावांमध्ये १४ सप्टेंबरच्या रात्री मुसळधार पावसाची जोरदार हजेरी लागली. काही तासांतच पावसाच्या पाण्याने शेती पाण्याखाली गेली. हाता-तोंडाशी आलेली पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

या पावसामुळे बाजरी, टोमॅटो, मका, डाळिंब, गवारी, मिरची, पालेभाज्या यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी उभ्या पिकांमध्ये पाणी साचून पिके कुजण्यास सुरुवात झाली आहे. मेहनत, खर्च आणि कर्ज करून उभ्या केलेल्या पिकांचे काही तासांत झालेले नुकसान पाहून शेतकरी हतबल झाले आहेत.

या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक डोंगर कोसळला असून, तातडीने मदत मिळणे गरजेचे असल्याचे शेतकरी सांगत आहेत. धामणी येथील शेतकरी रुपेश जाधव म्हणाले की, “आमच्या पिकांचे झालेले नुकसान भरून निघणे शक्य नाही. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी.”
शेतकऱ्यांच्या या मागणीवर प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन मदत करणे आवश्यक असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.

