मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील शिवसेना, युवासेना व सर्व अंगिकृत संघटनांचे पदाधिकारी शिवसैनिक यांची महत्वपूर्ण बैठक व शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कळंब येथे उत्साहात संपन्न झाला.
यावेळी आमदार शरद सोनवणे यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना आंबेगाव तालुक्यात शिवसेनेचे संघटन मजबूत असल्याने पुणे जिल्हा परिषद, आंबेगाव पंचायत समितीसह मंचर नगरपंचायत निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे असे आवाहन केले .शिवसेना लोकप्रतिनिधींना त्यांच्या गावातील विविध विकासकामांना निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे सांगून शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गाव तेथे शिवसेना शाखा व घर तिथे शिवसैनिक अभियान प्रभावीपणे राबवत गोर गरीब जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तत्परतेने काम करण्याचे आवाहन केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी मागील अडीच वर्षात घेतलेल्या अनेक धोरणात्मक निर्णयांमुळे शिवसेनेचा जनाधार राज्यात वाढल्याने विधानसभेत पुन्हा महायुतीची सत्ता आली. आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सर्वसामान्य शिवसैनिकांवर सातत्याने अन्याय केल्याची भावना असतानाही महायुतीच्या धर्माचे पालन करत आंबेगाव विधानसभेत हजारो शिवसैनिक मतदारांनी साथ दिल्याने काठावर का होईना दोन्ही राष्ट्रवादीच्या लढतीत महायुतीचा आमदार निवडून आला. निवडणूकीत विजय झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसैनिकांचे साधे आभार मानण्याचे देखील काम केले नाही. या वृत्तीचा आंबेगाव तालुक्यातील शिवसैनिकांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी सोबत युती न करण्याची पक्षनेतृत्वाकडे मागणी केली.

यावेळी युवासनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, शिवसेना पुणे जिल्हा परिषद मा.गटनेते देविदास दरेकर,, युवासेना पुणे जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे, तालुकाप्रमुख मल्हारी काळे, ज्योती गाडे, निरगुडसर सरपंच रविंद्र वळसे पाटील, वासुदेव भालेराव, भाऊसाहेब सावंत पाटील, नित्यानंद येवले, जेष्ठ शिवसैनिक खंडू खंडागळे, विजय केंगले, सरपंच महादेव कानसकर, पोपट थोरात यांनी मनोगतात आपापल्या भावना व्यक्त केल्या.
शिवसेनेचे आंबेगाव तालुकाप्रमुख प्रविण थोरात पाटील यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले. युवासेना तालुकाप्रमुख सरपंच वैभव पोखरकर यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले. बैठकीला मोठ्या संख्येने तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.
