जारकरवाडी येथे सोडली लहान वासरे, अन्न पाण्याविना होत आहेत मृत्यू

Share

मंचर प्रतिनिधी

आंबेगावच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये लहान मोकाट वासरे गावांच्या निर्जनस्थळी सोडल्याचे आढळून येत आहे. जारकरवाडी ( ता. आंबेगाव ) येथील कापडदरा काठापूर बुद्रुक येथील गणेश नगर परिसरात वनविभागाच्या हद्दीत तसेच स्थानिक शेतकऱ्यांच्या पडीक क्षेत्रात लहान वासरे मोकाट स्वरूपात सोडली जात आहेत. खायला पुरेसे अन्न व पाणी न मिळाल्याने या वासरांचा मृत्यू होत असून काही वासरे कुत्र्यांच्या भक्षस्थानी पडत आहेत.

जर्सी गाईला गोर्हा झाल्यावर पशुपालक रात्री अंधाराचा फायदा घेत हे वासरू निर्जन ठिकाणी सोडतो. त्याला गाईच्या दुधाची गरज असताना असे मोकाट सोडल्याने त्याचा मृत्यू होतो.

किंवा मोकाट सोडलेली वासरे मोकाट कुत्र्यांच्या भक्षस्थानी पडत आहेत. अनेक वासरे कुत्र्यांनी अर्धवट खाल्ल्याने त्याची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटत आहे.ज्याचा थेट परिणाम स्थानिकांच्या आरोग्यावर होतो आहे.

तसेच मोकाट कुत्र्यांना खायला काहीही न मिळाल्यानंतर ते स्थानिक शेतकऱ्यांची वासरे, शेळ्यांवरती हल्ला चढवत आहेत. या परिसरात बिबट्याचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य व वावर आहे. त्यात आलेले हे नवीन संकट यामुळे या परिसरातील शेतकरी व स्थानिक रहिवासी मेटाकुटीला आलेले आहेत. याबाबत तालुका प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विशाल कापडी व स्थानिक रहिवासी यांनी केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या