मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्रातील २५७ नगरपरिषद व ३७५ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी राज्य शासनाने सोडतीचे आयोजन केले आहे. ही सोडत येत्या सोमवार, दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी मंत्रालय, मुंबई येथे पार पडणार आहे.
नगर विकास विभागाच्या वतीने यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले असून, सर्व राजकीय पक्षांना या सोडतीसाठी दोन प्रतिनिधी पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मंत्रालयात प्रवेशासाठी मर्यादित व्यक्तींनाच परवानगी असेल.
नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, आरक्षणाच्या सोडतीदरम्यान पारदर्शकता आणि सुरक्षितता राखण्यासाठी प्रत्येक पक्षाने आपल्या दोन प्रतिनिधींची नावे सचिवांना पाठवावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगराध्यक्ष पदांचे आरक्षण ठरविण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आल्याने अनेक इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.
