मंचर प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील कांदा लागवडीचे मोठे क्षेत्र असलेल्या खेड आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यात बदललेल्या हवामानामुळे कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पावसाळ्यात पावसामुळे कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सातत्याने विक्री दरात चढ-उतार सुरू आहेत. शिवाय या वर्षी कांदा बियाणे तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीच्या दरात बियाणे खरेदी करून रोपे तयार करावी लागली आहेत. चार-पाच दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे उगवुन आलेली रोपांवर रोगराई पडुन संकटात आली आहेत. विशेष म्हणजे यावर्षी कांदा रोपांचा तुटवडा आहे.
नेहमीच कांदा पीक सातत्याने संकटात येत आहे. तरीही शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला प्राधान्य दिले आहे.
सततच्या पावसाने चाळीतील काद्यांचेही नुकसान झाले होते निवडणुकीचा कालावधी सोडला तर कांदा दरात चढ-उतार होत राहीला.ठराविक कालावधी सोडला तर कांद्याचे दर नेहमीच पडलेले आहेत.तरीही कांदा लागवडीला शेतकऱ्यांनी या वर्षी प्राधान्य दिले आहे..
कांदा बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागली आहे. जास्तीची किंमत मोजून कांदा बियाणे खरेदी करावे लागले आहे.अनेक अडचणीला सामोरे जात कांदा रोपे तयार केली असताना आता आलेली रोपेही हवामानामुळे संकटात आली आहेत. सततचे ढगाळ वातावरण व धुक्यामुळे कांदा पिकांवर परिणाम झाला आहे.
ढगाळ हवामानामुळे कांदा रोपांचे नुकसान होत आहे.
शेतीला मुबलक पाणी उपलब्ध आहे. मात्र, पोषक हवामान नसल्याने महागडी औषध फवारणी करूनही रोपांसह लागवड केलेल्या कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव कमी होत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक बळीराजाची चिंता वाढली आहे.
नोव्हेंबर-डिसेंबरमधील थंडीमुळे पिके जोमात येतात. मात्र, अजून कडाक्याची थंडी पडली नसल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. खरिपाप्रमाणेच रब्बीतही शेतकऱ्यांची मशागत, बियाणे, औषधांवरील खर्च वाया जाण्याची भीती जारकरवाडी येथील कांदा उत्पादक शेतकरी सुरज लबडे यांना व्यक्त केली आहे.

