पुणे प्रतिनिधी
उदापूर तालुका जुन्नर येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून प्रकाश दत्तात्रय सस्ते वय 33 या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना बुधवार दि. 25 दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान उघडकीस आली त्याने घराजवळच्या चिकूच्या झाडाला दोरीच्या मदतीने गळफास घेतला.
सस्ते याचे नातेवाईक व अविवाहित भाऊ निखिल यांनी माहिती दिली. की प्रकाश अल्पभूधारक शेतकरी होता. त्याला एक एकर शेती होती. तो खंडाने सात एकर शेती कसत होता. शेतीसह जोडधंदा म्हणून पशुपालन करून दुधाचा व्यवसाय करायचा शेतीसाठी आणि दुधाच्या व्यवसायासाठी त्यांनी जमिनीवर पतसंस्थाकडून कर्ज घेतले होते. तसेच काहीजणांकडून हात उसनेही पैसे त्यांनी घेतले होते. गेल्या काही महिन्यांपासून दुधाचे दर कोसळल्याने त्याची आर्थिक गणिते बिघडली होती .त्यामुळे त्याने काही दिवसांपूर्वी 18 गाईंपैकी दहा गाई विकल्या होत्या मात्र तरीही कर्जाचा बोजा वाढतच चालला होता.
दरम्यान आई-वडील भाऊ पत्नी दोन लहान मुले यांच्या भविष्यात कसे होणार ..?याची चिंता काही दिवसांपासून त्याला सतावत होती. यामुळे तो प्रचंड तणावात व आर्थिक विवंचनेत होता याच तणावाखाली त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आत्महत्या बाबत ओतूर पोलीस ठाण्यात प्रकाशचे वडील दत्तात्रय महादू सस्ते यांनी खबर दिली पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लहु थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत
